मुंबई मॅरेथॅानमधील 21 किमी गटात प्रियंका ओक्सा द्वितीय

गडचिरोलीकर युवकांचा सहभाग

गडचिरोली : पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना मुंबई मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी मिळाली. त्यात 21 किमी हाफ मॅरेथॉनमधील महिलांच्या 18 ते 24 या वयोगटात प्रियंका ओक्सा हिने द्वितीय क्रमांक पटकावत गडचिरोलीचे नाव उंचावले.

प्रियंका ओक्सा हिने संपूर्ण महिलांमध्ये चौथा क्रमांक व पूर्ण हाफ मॅरेथॉनमधील एकूण स्पर्धकांमध्ये 53 वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच कार्तिक भांडेकर याने 18 ते 24 या वयोगटात 21 किमीमध्ये 1 तास, 39 मी. 3 सेकंदमध्ये मॅरेथॉन पूर्ण करुन 19 वा क्रमांक, तर संदीप उसेंडी याने 25 ते 29 या वयोगटात 1 तास 39 मी. 5 सेकंदमध्ये मॅरेथॅान पूर्ण करून 22 वा क्रमांक पटकाविला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­ऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता आणि त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता पोलीस विभागाकडून कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे उपक्रम घेतले जातात. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक-युवतींनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचवता यावे या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील 18 युवक-युवती व पोलीस अधिकारी तथा अंमलदारांना मुंबई मॅरेथॅानमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली.

दि.18 रोजी मुंबई येथे झालेल्या या टाटा मॅरेथॉनमधील 21 कि.मी. (हाफ मॅरेथॉन) मध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडूसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी 68 पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी निवडक युवांना पाठविण्यात आले. या युवक-युवतींना मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहित्य (ट्रॅकसुट, शुज) पोलीस दलातर्फे देऊन तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात योग्य सराव करण्यात आला.

मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 21 किमी गटात गडचिरोली पोलीस दलाचे सपोनि.गंगाधर गायकवाड, मपोअं टिंकू चलाख, पोअं मडावी व प्रशिक्षणार्थी श्रेयस वाढई, अतुल गोटा, राजु पातरगड्डा, रमेश मडावी, अविनाश पदा, आदित्य मिटलामी, दिनेश पिट्टा, नयन गुरनुले, निखिल गुरनुले, गणेश गोटा, उमेश मट्टामी, ईश्वर तुलावी यांनी सहभाग नोंदविला.

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोलीचे युवक सहभागी व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार तसेच प्रशिक्षक पोउपनि.जांगी यांनी परिश्रम घेतले.