ग्रामिण भागात वाढला क्रिकेटचा हुरूप, ‘प्रवर्तक चषक-2’ची सांगता

अशोक नेते यांच्या हस्ते बक्षीस वितरण

चामोर्शी : गावोगावी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला बळ देण्यासाठी जोगना (ता.चामोर्शी) येथे ‘प्रवर्तक चषक-2’ या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामिण एक गाव – एक संघ या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, जोगनाच्या सरपंच अर्चना मेश्राम, क्षेत्र सहाय्यक आर.पी. धाईत, धान्य व्यापारी निलेश जेंगठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण गावाने एकत्र येत या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

युवकांना संधी मिळण्यासाठी स्पर्धा आवश्यक- नेते

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.खा.अशोक नेते म्हणाले,
“खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो केवळ मनोरंजन नाही तर आरोग्यासाठीही आवश्यक आहे. युवकांनी नियमित खेळ खेळल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. याशिवाय अशा स्पर्धांमुळे गावातील युवा खेळाडूंना नवी संधी उपलब्ध होण्यासोबत त्यांच्या कौशल्याला अधिक चालना मिळेल, असे ते म्हणाले. जोगना गावातील समस्या जाणून घेऊन, त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही नेते म्हणाले.

यावेळी डॉ.प्रणय खुणे, प्रकाश गेडाम, आशिष पिपरे यांनीही मार्गदर्शन करताना या स्पर्धेमुळे गावातील नवोदित खेळाडूंना संधी मिळाली असून, त्यांचे क्रिकेट कौशल्य पुढे नेण्यास मोठी मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रवर्तक संघाचे अध्यक्ष धनवान कोटरंगे, आर्यन निकोडे, देवानंद जेंगठे, विनोद निकोडे, अनिश झोडे, नयन निकोडे, रुपम जेंगठे यांनी विशेष परिश्रम घेतले.