प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुणवंतांचा घरी जाऊन केला सत्कार

आयएएस, डॅाक्टर बनण्याचे स्वप्न

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी सत्कार केला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेची विद्यार्थिनी वैष्णवी रंजीत मडावी हिने दहावीच्या परीक्षेत 78.20 टक्के गुण घेऊन यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे याच आश्रमशाळेची सोनाली एकनाथ आत्राम हिने 75 टक्के गुण प्राप्त केले. या दोन्हीही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तसेच पालकांचा शाल व श्रीफळ देऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी सत्कार केला. याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभू सादमवार उपस्थित होते.

वैष्णवी मडावी हिने प्रथम एमबीबीएस डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आय.ए.एस.बनण्याचा मानस असल्याचे सांगितले. सोनाली आत्राम हिने डॉक्टर बनण्याचे स्वप्न असल्याचे यावेळी बोलून दाखविले.