गडचिरोली : शहरातील कारगिल चौक ते चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण कामकाज, बंद असलेले स्ट्रिट लाईट्स आणि मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अशा स्थितीत चंद्रपूर मार्गावरील रस्ता दुभाजकावर बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे काढावे आणि रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कारगिल चौक ते चंद्रपूर मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील पाच ते सहा वर्षांपासून संथगतीने सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. अपूर्ण व नियोजनशून्य कामकाजामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री कारगिल चौक परिसरात दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात गडचिरोली नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीसमोर अचानक डुक्कर आल्याने हा अपघात घडला. परिसरातील अनेक स्ट्रीट लाईट्स बंद असल्याने वाहनचालकांना प्राणी दिसत नाही.
या मार्गावर बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) बसविण्याचे काम सुरू असून त्यामुळे वाहनचालकांना स्पष्ट दृश्यता मिळत नाही. विशेषतः यु-टर्नच्या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांच्यासह अॅड.कविता मोहरकर, सुचिता धकाते, निलिमा देशमुख, विद्या कुमरे, स्मिता दुधे, संगीता येन्गंधलवार, मनिषा धकाते, सुरेखा पाटील, हिरा वासनिक आदी उपस्थित होते.
































