गडचिरोली : गडचिरोली शहरातील दोन दहीहंडीसह अहेरी, सिरोंचा, देसाईगंज आणि इतरही भागात दहीहंडी स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभागी होऊन हजारो रुपयांची बक्षिसे पटकावली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनितित्त झालेल्या या दहीहंडीचा माहौल पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने अहेरीतील स्व.राजे विश्र्वेश्वरराव महाराज चौकात आयोजित भव्य दहीहंडी स्पर्धेचे उद्घाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बजरंग दलचे नवीन जैन, विक्की मांढरे, सदाशिव माकडे, भुवनेश्वर चुटे, अमित बेझलवार उपस्थित होते.
युवकांनी दहीहंडीच्या खेळात खिलाडीवृत्ती दाखवून आपल्या कलाकौशल्याचा विकास करावा, असे म्हणत धर्मरावबाबा यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. राज्याला सुजलाम, सुफलाम होऊ दे आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती नांदू दे, अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली. सणासुदीच्या उत्सवात आणि धार्मिक कार्यात मनात कुठल्याही प्रकारचे किंतू-परंतु न ठेवता राजकारण बाजूला ठेऊन सहभागी व्हावे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. या दहीहंडीतील 51 हजारांचे प्रथम पारितोषिक ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या वतीने देण्यात आले. हे बक्षीस जय श्रीराम टीम व्यंकटरावपेठा यांनी दहीहंडी फोडून पटकावले. प्रास्ताविक संतोष मंचालवार यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार चेतन कोकावार यांनी मानले.
गडचिरोलीतील दहीहंडी उत्सवात आ.डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती
गडचिरोली शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या निमित्याने दहीहंडी उत्सवाचे आयोजन विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी जन्माष्टमी उत्सवात आपल्या कुटुंबाप्रमाणे सार्वजनिक उत्सवात सहभाग नोंदवून हा उत्सव आनंदाने साजरा करून हिंदू संस्कृती जपावी, असे आवाहन आमदार डॅा.देवराव होळी यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रामायण खटी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजप नेते रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भ्रूगवार, दीपक भारसागडे, प्रकाश अर्जुनकर, राहुल भांडेकर, तसेच विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.