26 भरमार बंदुकांसह 11 नग बॅरल केले पोलिसांच्या स्वाधीन

अतिसंवेदनशिल क्षेत्रातून प्रतिसाद

गडचिरोली : दुर्गम-अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यवसायासोबतच शिकार करून उदरनिर्वाह करीत असत. शिकारीसह वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असत. माओवादी याचा फायदा घेऊन, सर्वसामान्य जनतेला माओवादी चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अशा वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे अतिसंवेदनशिल आणि दुर्गम वांगेतुरी भागातील नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

मागील पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्रातील एकही तरुण माओवादी चळवळीत भरती झालेला नाही. जिल्ह्रात मोजकेच सशस्र माओवादी शिल्लक असताना, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना आवाहन करत स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वच्छेने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आवाहन केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पोस्टे वांगेतुरी हद्दीतील हिदुर, नैनवाडी, तोडगट्टा या दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांनी 26 भरमार बंदुका व 11 नग बंदुकीचे बॅरल वांगेतुरी पोलिस स्टेशनमध्ये जमा केले. उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश रांजणकर यांच्या नेतृत्वात वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीप खडतरे, पोउपनि सादुलवार, पोउपनि काळे, पोस्टे वांगेतुरी येथील अंमलदार तसेच सीआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी राबविलेल्या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमुळे वांगेतुरी हद्दीतील नागरीक माओवादाच्या प्रभावाला झुगारत मुख्य प्रवाहामध्ये येताना दिसून येत आहेत.

सन 2022 मध्ये एकूण 73, सन 2023 मध्ये 46 व सन 2024 मध्ये एकूण 26 तसेच सन 2025 मध्ये आतापर्यंत एकुण 29 भरमार बंदूका व 12 बंदुकीचे बॅरल जिल्ह्रातील नागरिकांनी गडचिरोली पोलीस दलाकडे सुपूर्द केल्या आहेत. जिल्ह्रातील नागरिकांनी आतापर्यंत एकुण 365 भरमार बंदुका पोलीस दलाकडे सोपवल्या आहेत.