कडूबाईंच्या गोड भीमगितांनी अहेरीकरांना रिझविले, ठेक्यावर युवक-युवती थिरकले!

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि कडूबाई यांचा सत्कार करताना आयोजक
गीत सादर करताना कडूबाई खरात, तसेच डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देऊन सुरेंद्र अलोणे यांचा सत्कार करताना कडूबाई.

अहेरी : नाव कडूबाई असले तरी गळ्यात भीमगितांचा गोडवा असणाऱ्या सुप्रसिद्ध लोकगित, भीमगित गायिका कडूबाई खरात यांनी अहेरीकरांना खिळवून ठेवत चांगलेच रिझविले. रिमझिम पावसाची तमा न करता अहेरीकरांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रोत्साहनाने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच अहेरीच्या वतीने एस.बी. महाविद्यालयाच्या मागील भव्य पटांगणावर हा कार्यक्रम घेण्यात आला. “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं…” अशी साद घालत बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव करून देणारे स्वर गुंजताच अनेक युवक-युवतींनी त्याला प्रतिसाद देत ताल धरला आणि बाबासाहेबांचे उपकार आम्ही विसरणार नाही, असा जणू संदेश दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आणि बौद्ध समाज मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायण अलोणे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, गोंडवाना विद्यापिठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलु हकीम, रामेश्वररावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, माजी प्राचार्य रतन दुर्गे, एटापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे, कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सामाजिक चळवळीत सक्रिय राहात असल्याबद्दल सुरेंद्र अलोणे यांचा कडूबाई खरात यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद अलोणे यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.