गडचिरोली : सरकारी आचारसंहितेला बासनात गुंडाळून ठेवत चक्क एका बिअर बारमध्ये सरकारी फाईल घेऊन स्वाक्षऱ्या करणाऱ्या चामोर्शीच्या उपविभागीय अभियंत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्या अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी सदर निलंबनाचे आदेश काढले. देवानंद सोनटक्के असे त्या उपविभागीय अभियंत्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या मनिषनगर भागातील एका बारमध्ये सा.बां.विभागाचा सदर उपविभागीय अभियंता सरकारी फाईलवर स्वाक्षऱ्या करताना आढळला. नागपुरातील निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका वरिष्ठ अभियंत्याची त्या बारमध्ये पार्टी सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. त्याच पार्टीत चामोर्शीचा हा अभियंता सहभागी होण्यासाठी गेला होता. पण बारमधील एका टेबलवर बसून सरकारी फाईलवर स्वाक्षऱ्या करतानाचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्या अभियंत्याची फजिती झाली.
तो अभियंता त्या ठिकाणी मद्यप्राशन करून होता किंवा नाही हे तपासात समोर येईलच, पण अशा ठिकाणी सरकारी फाईल गेली कशी, त्या ठिकाणी बसून स्वाक्षऱ्या करण्यामागे नेमके काय कारण होते, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
दरम्यान बारमधील तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व क्षेत्रातून टिकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सीसीटीव्ही फुटेज समोर आले म्हणून कारवाई झाली, पण अशा किती घटना घडत असतील, अशी शंका व्यक्त करत एका अधिकाऱ्याची कार्यालयाबाहेर फाईल घेऊन जाण्याची हिंमत कशी झाली? याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.