गडचिरोली : शुक्रवारच्या ‘रेड अलर्ट’मध्ये दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पण संध्याकाळी अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने फारसा फटका बसला नाही. मात्र दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी तालुक्यात काही मार्ग अडल्याने आणि नदी-नाल्यांना पूर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरजवळ वैनगंगा नदीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
भामरागडला लागून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावर शुक्रवारी सकाळी पाणी चढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र संध्याकाळी पाणी पातळी कमी झाल्याने दुचाकी वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली होती. शनिवारी पुराचे पाणी पुलावरून वाहात नसले तरी पुलाला लागूनच असल्याने कोणत्याही क्षणी वाहतूक पुन्हा बंद होऊ शकते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) सिरोंचा-असरअली-जगदलपूर रस्ता, राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान, तालुका सिरोंचा), हलक्या वाहनांसाठी सुरू
2) अहेरी-वटरा रस्ता, राज्यमार्ग 370 (वटरा नाला, तालुका अहेरी)
3) कढोली ते उराडी नाला, ता.कुरखेडा