गडचिरोली : गेल्या 10 ते 12 दिवसांत तुरळक हजेरी लावणाऱ्या पावसाने रविवारपासून जोर काढला आहे. विशेष म्हणजे जवळपास पाच दिवस (गुरूवारपर्यंत) जिल्ह्यात कोणत्याही क्षणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.
जिल्ह्यात यावर्षी 469 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यात 77 गावांनी एक गाव एक गणपतीची ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. याशिवाय जवळपास दोन हजार घरांमध्ये गणेशाचे आगमन झाले आहे. गडचिरोली शहरासह अनेक ठिकाणी काही मंडळांकडून दरवर्षी विविध देखावे साकारले जातात. हे देखावे नागरिकांसाठी एक आकर्षण असते. पण पावसाळी वातावरणामुळे देखावे पाहण्याच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. मात्र गणेशोत्सवातील शेवटचे 4 दिवस वातावरण मोकळे राहण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
गणेश उत्सव शांततेत पार पडण्याकरिता गडचिरोली पोलीस दलाने चोख व्यवस्था लावली आहे. याकरिता 150 अधिकारी, 2000 पोलीस अंमलदार, 650 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गणेश उत्सवाच्या मिरवणुकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.