सीआरपीएफच्या 37 व्या बटालियनचा स्थापना दिवस

गौरवपूर्ण इतिहासाला उजाळा

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 37 व्या बटालियनचा स्थापना दिवस 1 जुलै रोजी गौरवपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. 1968 साली झालेल्या स्थापनेपासून आजपर्यंत या बटालियनने निर्माण केलेल्या वैभवशाली इतिहासाचा व उल्लेखनीय कामगिरीला याप्रसंगी उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाहिनीचे कमांडंट डी.ई. किंडो होते. याप्रसंगी द्वितीय कमान अधिकारी सुजीत कुमार, उपकमांडंट अनिल चंद्रमोरे, तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.वरुण मिश्रा उपस्थित होते.

वाहिनीचा ध्वज सन्मानाने उंच ठेवणाऱ्या वीर शहीदांना यावेळी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विशेष सैनिक संमेलन आयोजित करण्यात आले, त्यात शौर्य पदक विजेत्यांचा गौरव करण्यात आला. सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले.

मुसळधार पावसामुळे सांस्कृतिक संध्या व इतर काही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून ते योग्यवेळी आयोजित करण्यात येणार आहेत.