सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत भव्य शोभायात्रा

पारंपरिक वेशभुषेने वेधले लक्ष

गडचिरोली : थोर समाजसुधारक, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे, दूरदृष्टी असणारे तमाम बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी शहरातील मुख्य मार्गाने काढलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली.

सर्वप्रथम सेवालाल महाराजांच्या फोटोचे पूजन करून महाराजांना भोग दाखविण्यात आला. त्यानंतर शहरातील इंदिरा गांधी चौकात सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी बालकांनी सेवालाल महाराजांची वेशभूषा केली होती, तर महिला व युवतींनी बंजारा समाजाचा पारंपरिक वेष परिधान करून पारंपरिक गाण्यांवर नृत्य सादर केले. यातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडले. शोभायात्रेदरम्यान संत सेवालाल महाराजांचा जयघोष सुरू होता. महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले.

शोभायात्रेनंतर इंदिरा गांधी चौकातील सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये ऑल इंडिया बंजारा समाज सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजया विनय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला, तसेच डॉ.निखिल चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बंजारा समाजातील समस्या सोडविण्यासाठी एकजूट व्हावे असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील बंजारा समाजातील सर्व समाजबांधव सहभागी झाले होते.