गडचिरोली : आजच्या काळात धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. गुरूदेव सेवा मंडळामुळे शिस्तपणा व प्रेमभावनेची शिकवण पाहायला मिळते. तुकडोजी महाराजांच्या एका अभंगात माणूस द्या, मज माणूस द्या असे म्हणत माणसांनी माणसांसारखं वागलं पाहिजे, ही शिकवण दिली. सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविले पाहिजे. अशा आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्कारांची निर्मिती होते, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सावली तालुक्यातील अंतरगांव (टोला) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपीय कार्यक्रमात खा.नेते बोलत होते.
या पुण्यस्मरण महोत्सवात ग्रामगीता तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी दोन दिवसीय भव्य खंजेरी स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा समारोप दि.९ ला झाला. यावेळी गोपालकाला व खा.अशोक नेते यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गडचिरोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी सुद्धा गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने खा.अशोक नेते व प्रशांत वाघरे, तसेच माजी जि.प.अध्यक्ष सोमया पसुला यांचा शाल, श्रीफळ व डोक्यावर गुरुदेव टोपी घालून सत्कार करण्यात आला. यावेळी अंतरगावचे सरपंच कविंद्र लाकडे, माजी सरपंच तथा सामाजिक नेत्या उषा भोयर, भाजपाच्या जेष्ठ नेत्या छाया चकबंडलवार, पो.पा.छगन उंदिरवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळू सहारे, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख जितेंद्र म्हस्के, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शिशुपाल ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने गुरूदेव सेवा मंडळाचे अनुयायी उपस्थित होते.