गडचिरोली : विविध विभागांच्या प्रतीक्षा यादीवर असलेल्या जिल्ह्यातील 286 उमेदवारांपैकी 53 जणांना नोकरीची संधी मिळणार आहे. 13 विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी येत्या 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा मेळाव्याचे आयोजन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक १ सप्टेंबर रोजी अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पोलिस विभागासह राज्य शासनाच्या एकूण ५१ विभागांचा समावेश करण्यात आला असून, संबंधित विभागातील अर्ज व प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात विचारासाठी सादर केली जाणार आहेत.
या अनुकंपा मेळाव्यात ‘क’ वर्ग पदांवरील प्रकरणांचा विचार केला जाणार आहे. शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नियुक्त प्राधिकार्यांनी सुचविलेल्या रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
1 सप्टेंबर रोजी आयोजित अनुकंपा मेळाव्यात उमेदवारांचे समुपदेशन करून संबंधित विभागांना नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण 286 उमेदवारांची सामाईक प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, विविध 13 विभागांकडून 53 पदांची मागणी प्राप्त झाली असून, त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना नियुक्तीची संधी मिळणार आहे.
अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेतील प्रलंबित प्रकरणांचे त्वरित निवारण करून पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचा प्रशासनाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.