देसाईगंज : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील जुनी लाडजमधील पूरग्रस्तांचे 1961-62 मध्ये देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नवीन लाडज या गावात पुनर्वसन केले होते. मात्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला नव्हता. अखेर 17 सप्टेंबर 2025 रोजी जमावबंदी आयुक्त पुणे यांन व्हिलेज कोड बहाल करत नवीन लाडज गावाला महसुली गावाचा दर्जा दिला. याचा आनंद गावकऱ्यांनी साजरा केला.
3 नोव्हेंबर 2016 ला नवीन लाडज वाडीचे गावात रूपांतर करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या अधिसूचनेची अंमलबजावणी तब्बल 8 वर्ष उलटून देखील केली नसल्याने मागील 9 जानेवारी 2025 पासून गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर 63 वर्षाच्या लढ्याला यश येऊन गावाला व्हिलेज कोड बहाल करण्यात आला. स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गावांत गुलाल उधळून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
































