कोंढाळा येथील जत्रोत्सवात सामाजिक उपक्रमांची भर

जपताहेत पारंपरिक पुजेचा वारसा

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे 200 वर्षांपेक्षा जास्त काळापासून भरत असलेला जत्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या जत्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक महादेवजी बुराडे यांच्या घरी परंपरेनुसार होणारी देवाची विधिवत पुजा. विशेष म्हणजे, त्यांच्या पणजोबांच्या काळापासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. काळानुसार या उत्सवाला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

कोंढाळा येथील बुराडे परिवारात होणारी देवपुजा गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा विषय आहे. होळीनिमित्त महादेवजी बुराडे यांच्या घरी रात्रीपासूनच विविध धार्मिक विधींना सुरुवात होते. पणजोबांपासून सुरू झालेला हा वारसा आजच्या पिढीनेही तितक्याच निष्ठेने जपला आहे. दरवर्षी या पूजेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या परंपरेत आता भर पडून जत्रेचे स्वरूप आले आहे.

जत्रेचे औचित्य साधून यंदा गावकरी आणि उत्सव समितीच्या वतीने भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मनोरंजनासोबतच लोककलेचा वारसा जपण्यासाठी दोन नाटकांचे प्रयोग आणि एका तमाशा मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमुळे जत्रेच्या उत्साहात अधिकच भर पडली. रात्री उशिरापर्यंत रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली.

जत्रेच्या निमित्ताने परिसरात मोठी दुकाने सजली. खेळणी, घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. कोंढाळा येथील ही जत्रा केवळ धार्मिक उत्सव न राहता परिसरातील गावांच्या सामाजिक एकात्मतेचे प्रतीक बनली आहे.