
गडचिरोली : भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयासह गेल्या वर्षभरात उघडलेल्या अतिसंवेदनशिल भागांमधील नवीन पोलीस मदत केंद्रांमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. बिनागुंडात माओवाद्यांनी उभारलेले स्मारकही नष्ट करत नागरिकांना भयमुक्त वातावरणाचा संदेश देण्यात आला. याशिवाय राष्ट्रपती शौर्यपदक मिळालेल्या पोलीस अधिकारी व जवानांचा प्रशस्तीपत्र देऊन गडचिरोलीत सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक कार्यालयात नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी (गडचिरोली) सुरज जगताप हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर यांच्या आदेशान्वये वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या 10 पोलीस अंमलदारांनाही प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. माओवादविरोधी अभियानात आपल्या शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर शहीद कुटुंबियांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
अतिदुर्गम भागात प्रथमच फडकला झेंडा
गेल्या एक वर्षात नव्याने उभारण्यात आलेल्या पोस्टे नेलगुंडा, कवंडे, तुमरकोठी, पोमके फुलणार येथे देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दि.24 जानेवारी 2026 रोजी बिनागुंडा गावात नव्याने उभारण्यात आलेल्या अतिदुर्गम पोमकें बिनागुंडा येथे देखील पहिल्यांदाच अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, सिआरपीएफचे उपकमांडण्ट 9 बटालियन योगेंद्र धाकोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते, तसेच बिनागुंडा, कुवाकोडी, पेरमिलबट्टी, पुंगासूर, फोदेवाडा व इतर गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
बिनागुंडा येथील विनोबा प्राथमिक आश्रमशाळेत अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा यांच्या हस्ते व इतर वरिष्ठ अधिकारी व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस.जे. शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी आदित्य पोदाडी याने देशभक्तीपर वातावरणात महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी आश्रमशाळेलगतच माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेले माओवाद्यांचे स्मारक वरिष्ठ अधिकायांच्या उपस्थितीत बिडीडीएस पथक, सी-60 पथक व पोमकें बिनागुंडा येथील पथकाद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
































