गडचिरोली : जिल्ह्यात सलग 12 दिवस राहिलेल्या पूरस्थितीने अनेकांवर मोठी आपत्ती ओढवली. पुराचा वेढा, बंद असलेल्या मार्गामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या आणि वाहत्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यापर्यंतच्या सर्व आपत्तीचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी निवारण केले. विशेष म्हणजे पथकाची मदत वेळेत मिळू न शकल्याने कोणाला जीव गमवावा लागण्याची एकही घटना घडली नाही हे विशेष.
दि.17 जुलैला गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे नाला व नदीच्या पाण्यात अडकलेल्या 5 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दि.18 ला सिरोंचा माल (सूर्यापल्ली) येथील 40 घरांमध्ये पाणी शिरल्याने 36 लोकांना जि.प.शाळेत हलविण्यात आले. याशिवाय सिरोंचा रै येथील मॅाडेल स्कूलच्या वसतिगृहाच्या परिसरात पाणी साचल्याने 76 विद्यार्थ्यांना कस्तुरबा गांधी शाळेत सुरक्षीतपणे हलविण्यात आले.
दि.21 ला गडचिरोली तालुक्यातल्या कोटगल बॅरेज परिसरातील 70 कामगारांना सुरक्षेच्या दृष्टिने हलविण्यात आले. तर भामरागडमधील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने 20 नागरिकांना त्यांच्या परिचितांकडे स्थलांतरित करण्यात आले.
दि.22 ला गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील 19 नागरिकांना हलविले. दि.23 सिरोंचा तालुक्यातील चिक्याला येथे आपल्या नातेवाईकाकडे आलेल्या तेलंगणातील गरोदर महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याने महसूल व आरोग्य पथकाने परसेवाडा व टेकला प्रा.आ.केंद्रात भरती केले. तिची मध्यरात्री नॅार्मल प्रसुती झाली.
दि.24 ला गडचिरोली तालुक्यातील माडेतुकूम येथील महिलेला सर्पदंश झाल्याच्या संशयातून पुराच्या पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी पाठविले. मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथील गर्भवती महिलेला छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे उपचारासाठी पाठविले. याशिवाय गडचिरोली तालुक्यातल्या पाल नदीच्या पुलावर फसलेल्या ट्रक चालकाला पुराच्या पाण्यातून सुखरूपणे बाहेर काढले.
दि.25 ला गडचिरोली तालुक्यातल्या चुरचुरा माल येथे नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांना गावातील युवकासह पथकांनी वाचवले. तसेच रामनगरातील घर पडल्याने घरातील 4 सदस्यांना कोटगलच्या निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले. याशिवाय चांदाळा येथे शेतात अडकून पडलेल्या 59 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. तर कुंभी येथे वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या दोन महिलांसह एका व्यक्तीला नदीतून नावेच्या सहाय्याने बाहेर काढले. तसेच पोलिस भरतीच्या परीक्षेसाठी 6 विद्यार्थ्यांना नावेच्या मदतीने पुरातून बाहेर काढत गडचिरोलीला पोहोचवण्यात आले. रानमूल येथेही पुराच्या पाण्यात वेढल्या गेलेल्या 2 व्यक्तींना रात्री 9 वाजता नावेद्वारा बाहेर काढले. तर भामरागड येथे पुरामुळे अडकून पडलेल्या पोलिस भरतीसाठी जाणाऱ्या 26 विद्यार्थ्यांना आणि 36 प्रौढ व्यक्तींना बोटीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात आले.
दि.29 ला भामरागडमधील 4 विद्यार्थ्यांना आणि 4 नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी नावेच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील समाजकल्याण वसतिगृहाच्या मागे 11 केव्ही वीज केंद्राच्या अत्यावश्यक कामासाठी गेलेल्या पण पुरामुळे अडकून पडलेल्या 3 वीज कर्मचाऱ्यांना पथकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, एसडीआरएफ, आपदा मित्र, तसेच महसूल व पोलिस यंत्रणेच्या समन्वयातून हे काम यशस्वी झाले. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नील तेलतुंबडे यांनी विशेष मेहनत घेतली.