गडचिरोली : जवळपास दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळी पावसाने जोरदार एंट्री केली. अहेरी, मुलचेरा भागात सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे नाल्यांना पूर आला आहे. अशातच सायंकाळी मुलचेरा तालुक्यातील कोलपल्लीच्या नाल्यातून जात असताना ग्रामसेवकाचे चारचाकी वाहन पाण्यात वाहून गेले. प्रसंगावधान राखत ग्रामसेवक धोडरे यांनी एका झाडाला पकडून ठेवत स्वत:ला वाचवले. दरम्यान बचाव पथकाने रात्री त्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या वाक्प्रचाराचा प्रत्यय या घटनेने दिला.
मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे (45 वर्षे) हे सायंकाळी आपल्या कारने चंद्रपूरकडे निघाले होते. गोमनी ते लगाम रस्त्यावरील कोलपल्ली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहात होते. धोडरे यांनी त्या पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न केला. पण वाहनाला जोरदार पाण्याचा लोंढा लागला आणि वाहन वाहून जाऊ लागले. मात्र धोडरे यांनी प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडून एका झाडाला पकडले. त्यावर चढून त्यांनी बचाव यंत्रणेशी संपर्क साधला.
या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथकाने तिकडे धाव घेतली. अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबवून धोडरे यांना पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य तपासणीनंतर घरी रवाना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वेळीच केलेल्या धावपळीमुळे मोठी दुर्घटना टळली.
मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या असून अशा ठिकाणी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे व पूलावरून पाणी वाहत असताना पाण्यात गाडी न टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.