गडचिरोली : येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव बालाजी पिपरे यांचे दि.27 जानेवारीला दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.शंकरराव पिपरे यांनी प्रदीर्घ सेवाकाळात शेकडो विद्यार्थ्यांना घडवून शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. साधेपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून ते सर्वांच्या स्मरणात राहतील.
त्यांच्या पश्चात पुत्र माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, अनिल पिपरे, नातू अनुराग, ऋषिकेश, लोकेश, सून नगरसेविका योगिता पिपरे (माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दि.28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 दरम्यान गडचिरोली येथील रेड्डी गोडाऊनजवळील निवासस्थानापासून निघणार असून वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
































