महसूल सप्ताहाचे उद्घाटन, उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार

प्रशासन गतीमान करा– जिल्हाधिकारी

गडचिरोली : शासनाच्या सर्व महत्वाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही महसूल प्रशासनाच्या खांद्यावर असून, ही जबाबदारी अत्यंत समर्पणाने पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी (दि.1) महसूल दिन व महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रशासन अधिक गतीमान व प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, महसूल विभाग ही शासनाची सर्वात महत्वाची व्यवस्था आहे. काळानुरूप महसूल कामांसोबतच इतरही जबाबदाऱ्या वाढत आहेत. नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करणे हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून ती सुरळीत पार पाडण्याचे दायित्व महसूल प्रशासनावर आहे. महसूल सप्ताहात होणारी चांगली कामे ही केवळ एका आठवड्यापुरती मर्यादित न ठेवता, त्याची नियमितता राखावी, असेही त्यांनी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत महसूल दिनाच्या शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ‘कलेक्टर हे शासनाचे सर्वात पहिले पद असून महसूल विभाग ही शासनाची सर्वात जुनी व महत्वाची यंत्रणा आहे,’ असे सांगून चांगल्या कामगिरीसाठी सन्मानित झालेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी महसूल सप्ताहाच्या उपक्रमांची माहिती देताना, महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महसूल प्रशासनाचा इतिहास सांगितला. रिक्त पदे व कार्यभाराच्या अडचणी असूनही विभागाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद करत सर्वांनी मिळून हे योगदान कायम राखावे असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेचे ओळखपत्र आणि अंत्योदय योजनेचे कार्ड वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार वनिशाम येरमे यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.