

गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारच्या पहाटे झालेल्या भीषण अपघातात 4 शाळकरी मुलांना जीव गमवावा लागला, तर दोन मुले गंभीर जखमी झाले. या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर काटली, साखरा आणि परिसरातील गावकऱ्यांनी काटलीत चक्काजाम आंदोलन सुरू करून मुख्य मार्ग अडवून धरला. सकाळी 8 ते दुपारी 12 असे जवळपास चार तास हे आंदोलन सुरू होते.

प्राप्त माहितीनुसार, काटलीतील सातवी ते दहावीतील काही विद्यार्थी पहाटे 5.30 वाजता मॅार्निंग वॅाक आणि व्यायाम करण्यासाठी गावालगतच्या नदीपर्यंत गेले होते. मुख्य रस्त्यावर पहाटे वर्दळ राहात नसल्याने ते बिनधास्तपणे रस्त्यावरच बसून व्यायाम करत होते. मात्र त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात टिंकू नामदेव भोयर (14 वर्ष), इयत्ता 8 वी (कै.सीताराम पाटील मुनघाटे विद्यालय काटली) आणि सुशांत दुर्योधन मेश्राम (15 वर्ष), इयत्ता 9 वी, (कै.सीताराम पाटील मुनघाटे विद्यालय काटली) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार राजू मारबते (13 वर्ष), इयत्ता 7 वी (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काटली) आणि तनवीर बालाजी मानकर (16 वर्ष) इयत्ता 10 वी (लिसिट हायस्कूल, ठाणेगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इतर जखमींमध्ये आदित्य धनंजय कोहपरे (14 वर्ष), इयत्ता 8 वी (कै.सीताराम पाटील मुनघाटे हायस्कूल काटली) आणि क्षितिज तुळशीदास मेश्राम (13 वर्ष), इयत्ता 7 वी (जि.प.उच्च प्राथमिक शाळा काटली) यांना उपचारासाठी लॅायड्स मेटल्सच्या हेलिकॅाप्टरने नागपूरला पाठविण्यात आले.
सकाळी जवळपास 7 ते 7.30 वाजतापासून नागरिकांनी रस्त्यावर जमायला सुरूवात केली. बैलबंड्या आडव्या लावून रस्ता अडविल्यानंतर गावातील महिला-पुरूषांनी रस्त्यावरच ठाण मांडले. तब्बल 4 ते 5 तास हे आंदोलन सुरू होते. सकाळी 10 वाजेपर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने गावकरी रोष व्यक्त करत होते. पण त्यानंतर काही वेळातच माजी खासदार अशोक नेते आंदोलनस्थळी दाखल झाले. ते जनभावना ऐकून घेत असताना आमदार डॅा.मिलिंद नरोटे पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केल्याचा निरोप दिला. तसेच मंत्री दादा भुसे येणार असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास 11.15 च्या सुमारास मंत्री दादा भुसे आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांनी शासनाची बाजु मांडत गावकऱ्यांना शांत केले. त्यानंतर हे आंदोलन थांबवत असल्याचे सरपंचांनी जाहीर केले.
लॅायड्सने दाखवली पुन्हा एकदा माणुसकी
या अपघातानंतर जखमी मुलांवर सुरूवातीला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण त्या मुलांना आणखी तज्ज्ञांच्या देखरेखीत उपचाराची गरज असल्याने नागपूरला हलविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा त्या मुलांसाठी आपले हेलिकॅाप्टर उपलब्ध करून दिले. आता दोन्ही मुलांचे प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी एका पोलीस जवानाला आलेल्या हार्ट अटॅकनंतर त्यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यासाठी लॅायड्सने हेलिकॅाप्टर उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आठवडाभरातच दुसऱ्यांचा ते मदतीसाठी धावून आले.
अनेक पक्षांचे पदाधिकारी-अधिकारी आंदोलनस्थळी
या आंदोलनाला भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खा.अशोक नेते, आ.डॅा.मिलिंद नरोटे, काँग्रेसचे सतीश विधाते, शेकापचे रामदास जराते, भाकपाचे अमोल मारकवार, आझाद समाज पार्टीचे राज बन्सोड, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, विलास दशमुखे, अनिल तिडके यांनी भेट देऊन गावकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आणि त्यांची समजूतही काढली. याशिवाय मंत्री दादा भुसे यांच्यासोबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक गोपाल जी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, एसडीओ रणजित यादव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात ठेवले.
वाहनाला शोधण्यासाठी पाच पथकं
चार मुलांचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन गडचिरोली येथे भारतीय न्यायसंहिता कलम 105 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या वाहनाचा शोध घेण्यासाठी आणि गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे 5 पथक कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. त्यांनी मृत मुलांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. राज्य सरकारकडून मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रतिकुटुंब 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जखमी युवकांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले.