गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात दिवसीय विदर्भ प्रांतस्तरीय शिबिराची रविवारी सांगता झाली. या शिबिरानंतर गडचिरोली शहराच्या प्रमुख मार्गावरून स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. या स्वयंसेवकांचे इंदिरा गांधी चौकात भाजप नेते आणि माजी खासदार डॅा.अशोक नेते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले.
यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, गजानन येनगंदलवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, माजी भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, आदिवासी मोर्चाचे जिल्हा महामंत्री विनय मडावी, अनिल करपे, अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पथसंचलनामुळे शहरात देशभक्ती, शिस्तबद्धता आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण अनुभवायला मिळाले. रॅलीदरम्यान स्वयंसेवकांनी केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.