शारदा मंडळाने साकारलेला देखावा ठरला कुरूडचे आकर्षण

मा.आ.गजबे यांची सहपरिवार भेट

देसाईगंज : कुरूड येथील बळीराजा चौकात राजमाता जिजाऊ महिला संघ व बळीराजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मातेची घटस्थापना करण्यात आली आहे. यासाठी साकारलेल्या देखाव्यात पारंपरिक स्वयंपाकघराची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. मातीने सारवलेल्या भिंती, आकर्षक रांगोळी, जुना कंदील, जुने जाते, स्वयंपाकघरातील भांडे, आणि गराडी फांद्यांनी तयार केलेले कुंपण अशा गावशैलीतील वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. या देखाव्यातून जुनी संस्कृतीचा परिचय नव्या पिढीला केला जात आहे.

या उपक्रमामुळे गावातील परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य होत आहे. शारदा मातेच्या पूजनाच्या निमित्ताने दिनांक 27 सप्टेंबर रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सहपरिवार उपस्थित राहून शारदा मातेचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी मंडळाच्या कला-संस्कृतीचे कौतुक करत गावाकडील जुन्या संस्कृतीला वाव मिळतोय, हे अत्यंत अभिमानास्पद आहे, असे सांगितले. तसेच अशा उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य होत असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे गावकऱ्यांनी व उपस्थितांनी आनंदाने स्वागत केले.