‘गण गण गणात बोते’च्या गजरात चुरचुरा, पोर्लात उत्सव

डॅा.अशोक नेते यांची उपस्थिती

गडचिरोली : संत गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा (माल) येथील माँ पुजामोती देवस्थान परिसरात भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पावन सोहळ्यानिमित्त संपूर्ण परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या अनोख्या वातावरण माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी सदिच्छा भेट देत भजन-पुजनात सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पोर्ला येथेही डॉ.नेते यांनी दर्शन घेऊन परिसरातील भाविकांशी संवाद साधला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चुरचुरा येथील माँ पुजामोती देवस्थानात पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी, अभिषेक व भजन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी परिसरातील हजारो भाविकांची मांदियाळी होती. भजनात तल्लीन झालेले भक्त, जयघोषांचा निनाद आणि सर्वत्र पसरलेला भक्तिभाव यामुळे यात्रेला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त झाली होती.

यात्रेदरम्यान मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी उपस्थितांशी संवाद साधत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भजनात सहभागी होऊन श्रद्धेचा आदर्श घालून दिला. त्यानंतर त्यांनी भाविकांसोबत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच स्वतः महाप्रसादाचे वितरणही केले. “अशा धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांमुळे समाजात एकोपा, बंधुता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चुरचुरा व पोर्ला येथील भाविकांची नितांत श्रद्धा आणि उत्साह पाहून मन प्रसन्न झाले,” असे उद्गार डॉ.नेते यांनी यावेळी काढले.

पोर्ला येथेही घेतले दर्शन

संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पोर्ला येथे डॉ.नेते यांनी दर्शन घेऊन भक्तीभावाने नतमस्तक होत परिसरातील भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या डॉ.दिप्ती अभिजित कोरडे, पोलीस पाटील शशांक कुलसंगे, भास्कर कुलसंगे, अभिजित कोरडे, देवीदास भोयर, भाऊसाहेब दशमुखे, उकड राऊत, देवस्थान समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.