गडचिरोली : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने गडचिरोली, लांजेडा, माडेतुकुम, बोधली व खरपुंडी या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक नैतिक महासभेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आले. संताजीसारख्या थोर संताची आठवण तेली समाजाने कायम ठेवावी. त्यांच्या प्रेरणेने समाजाला खूप काही घेण्यासारखे आहे. त्यातून तेली समाजाला जागृत, सुसंस्कृत करण्याचे काम गावागावात संघटनेमार्फत झाले पाहिजे, असे आवाहन या कार्यक्रमात प्रमोद पिपरे यांनी केले.
महाराष्ट्राला अनेक थोर संत महात्म्यांची परंपरा लाभली आहे. संताजींनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने वैदिक धर्माचे, गीता धर्माचे पालन करत जीवनभर समाजाला कल्याणाचा मार्ग दाखवला. यातील एक महान संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज होय. त्यांना संताजी महाराज म्हणूनही ओळखले जाते. संताजी महाराज हे तुकाराम महाराजाचे शिष्य होते. संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा समाजकंटकांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सर्व गाथा संताजी महाराजांना मुखोद्गत, म्हणजे तोंडपाठ होती. त्यामुळे तुकारामांनी लिहिलेली गाथा जशी होती तशी संताजींनी पुन्हा लिहून काढली. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या विचारांना पुढे तेवत ठेवण्याचे महान काम संताजी जगनाडे महाराजांनी केल्याचे पिपरे म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र तेली महासभेच्या विदर्भ महिला आघाडीच्या उपाध्यक्ष योगीता पिपरे, प्रकाश गेडाम, डॉ.गजानन बुरांडे, रमेश भुरसे, धनेश कुकडे, वामन क्षीरसागर, श्रावण बोबाटे, भाऊराव सोमणकर, भास्कर नैताम, सुधाकर नैताम, अतुल चलाख, रमेश नैताम, जीवन बुरांडे, केतन भांडेकर यांच्यासह तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.