आता सरकारी खर्चातून लावा फळबाग, बांबू अन् फुलझाडे !

शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जॉब कार्डधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर, पडीक तसेच शेतजमिनीवर फळबाग लागवड, बांबू लागवड आणि फुलझाडांच्या लागवडीतून उत्पादन घेण्याची संधी कृषी विभागाने विभागाने उपलब्ध करून दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

योजनेचा तपशील आणि मिळणारे 100 टक्के अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान दिले जाते. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून यामध्ये रोपे खरेदी, खड्डे खोदणे, लागवड करणे, खत व्यवस्थापन आणि महत्त्वाचे म्हणजे तीन वर्षांपर्यंत रोपांची निगा राखणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे केवळ जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

कोण पात्र ठरणार?

या योजनेसाठी विविध समाज घटकातील शेतकरी पात्र ठरतील. यामध्ये खालील प्रमुख गटांचा समावेश आहे:
अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या जमाती (NT), निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती-De-notified Tribes), दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य करणे)अधिनियम, 2006 (2007 चा 2)मधील पात्र लाभार्थी, सीमान्त व लहान शेतकरी

गडचिरोलीत दर्जेदार कलमांची उपलब्धता

गडचिरोली जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, फणस या पिकांसाठी लाभार्थ्यांची पसंती सातत्याने वाढत आहे. या पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. यासाठी कृषी विभागामार्फत प्रचार, प्रसिद्धी आणि मार्गदर्शन केले जात आहे. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत उच्च दर्जाची फळपिके लावण्यासाठी, शासकीय दरात उच्च दर्जाची कलमे सोनापूर, वाकडी (गडचिरोली), कृष्णनगर (चामोर्शी), कसनसूर (एटापल्ली) व रामगड (कुरखेडा) येथील शासकीय फळरोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्या ग्राम पंचायत कार्यालय, ग्राम रोजगार सेवक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी लागणारे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी फळबाग, बांबू तसेच पुष्पोत्पादन पिकांच्या लागवडीत सहभाग घेऊन आपल्या शेतीत फळबाग लागवडीच्या माध्यमातून समृद्धी आणावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.