Home दैनंदिन बातम्या राज्यस्तरावर आदर्श शाळा म्हणून कुनघाड्याच्या शाळेला बहुमान

राज्यस्तरावर आदर्श शाळा म्हणून कुनघाड्याच्या शाळेला बहुमान

आ.डॅा.नरोटे यांनी केला सत्कार

गडचिरोली : कुनघाडा रै.येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला शासनाने राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर केला आहे. या शाळेने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. या यशामागे शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थिनींची मेहनत आणि पालकांचा विश्वास यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी या शाळेला भेट देऊन शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतात, याचा हा उत्तम नमुना असल्याचे आ.डॅा.नरोटे म्हणाले.

शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत क्रीडांगण, ग्रंथालय, स्वच्छतागृह, तसेच मुलींसाठी ‘पिंक रूम’ अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनोदय यावेळी डॅा.नरोटे यांनी व्यक्त केला. आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. कुनघाडा येथील शाळेला मॅाडेल शाळा म्हणून विकसित करून संपूर्ण गडचिरोली विधानसभेसाठी एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा सचिव आनंद भांडेकर, उपाध्यक्ष अनिल पोहनकर, उमेश कुकडे, मोहन चिलंगे, दीपकॉ सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.