गडचिरोली : आजच्या काळात आरोग्याला अतिशय महत्व आले आहे. आपले सुदृढ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळण्यावरही भर द्यावा, असे प्रतिपादन गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे जिल्हा सचिव विलास केशवराव दशमुखे यांनी केले.
काटली केंद्राअंतर्गत कुराडी येथे शालेय बालकला व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निरंजन लाडवे तर उद्घाटक म्हणून सरपंच प्रमोद पाटील मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संगीता खोब्रागडे, केंद्रप्रमुख रवी मुलकलवार, ग्रामपंचायत सदस्य रूपचंद सिडाम, सुधाकर चौधरी, उपसरपंच प्रशांत खोब्रागडे, अनिल शेडमाके, गोपाल दशमुखे, शशांक कुलसंगे, दुर्गा धानोरकर, प्राजंल फुलझेले आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते. याच शाळांमधून मोठे राजकीय पुढारी, उद्योगपती, खेळाडू निर्माण झाले आहेत. त्याच पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशाचे शिखर गाठावे. आपल्या गावाचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन दशमुखे यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा झाँकीचे सादरीकरण केले. या तीन दिवसीय संमेलनात 13 शाळांचे विद्यार्थी सहभागी होत आहेत.