राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी ‘प्लॅटिनम’च्या कावेरीची निवड

इन्स्पायर अवॉर्डमध्ये मॅाडेल अव्वल

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कावेरी ए.प्यारमवार हिने इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाच्या जिल्हास्तरीय फेरीत अभिनव प्रकल्प सादर करून थेट राज्यस्तरीय फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

कावेरीचा प्रकल्प ‘बायोडिग्रेडेबल प्लास्टिक” या विषयावर आधारित असून, त्यात तिने प्लास्टिक प्रदुषणावर पर्यावरणपूरक उपाय सुचवला आहे. विघटनशील पदार्थांच्या साहाय्याने निसर्गास अनुरूप असा हा पर्याय सुचवत कावेरीने विज्ञान अणि पर्यावरणातील दुवा मजबूत केला आहे. तिच्या या उपक्रमामुळे शाळेचे नाव जिल्हयाबरोबरच विभागातही उजळले आहे.

या यशाबद्दल नागपूर विभागाच्या उपसंचालक डॉ.श्रीमती सावरकर यांनी कावेरीचा गौरवपूर्वक सत्कार केला.
शाळेचे महासचिव अजिझ नाथानी यांनी म्हटले, ‘कावेरीचा हा नवोन्मेषी विचार आमच्या शिक्षण तत्वज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्लॅटिनम ज्युबिली नेहमी विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार करणारे, समाजोपयोगी संशोधनाचे व्यासपीठ देते. कावेरीने या परंपरेस अधिक बळ दिले आहे.’

प्राचार्य रहिम आमलानी यांनी कावेरीचे कौतुक करताना ‘कवेरीची मेहनत, तिचे मार्गदर्शक शिक्षक अमोल चापले आणि विशाखा चिलमवार, तसेच सर्व शिक्षकांचे योगदान आणि पालकांचा पाठिंबा हे तिन्ही घटक मिळूनच यशाचा पाया रचतात. ही विद्यार्थिनी आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे.’

शैक्षणिक प्रमुख अमिन नुरानी यांनी कावेरीसारखे विद्यार्थी आमच्या शाठेच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा कणा आहेत. आम्ही नेहमी विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांची भावना रुजवण्याचा प्रयत्न करतो. कावेरी या मूल्यांचा जिवंत पुरावा आहे, असे गौरवोद्गार व्यक्त केले.

राज्यस्तरीय फेरीसाठी संपूर्ण गडचिरोली जिल्हयातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.