गडचिरोली : केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे इन्स्पायर अवॉर्डअंतर्गत 17 व 18 नोव्हेंबर रोजी ‘डॉ.कमल रणदिवे विज्ञाननगरी’, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नवेगाव येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याबाबत वातावरण निर्मितीसाठी शनिवारी गडचिरोली शहरातून विज्ञान दिंडी काढण्यात आली.

चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूल येथून निघालेल्या या दिंडीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून विज्ञान निष्ठा जपावी. वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करून जीवन सुखकर करावे. इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वैज्ञानिक होण्याची संधी साधावी, असे आवाहन यावेळी सीईओ गाडे यांनी केले.
यावेळी समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकुंद मशाखेत्री व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान दिंडीत शहरातील विद्याभारती कन्या हायस्कूलच्या वतीने विज्ञान पालखी व डॅा.विक्रम साराभाई यांची वेशभूषा तसेच अवकाश उपग्रह देखावा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांचेकडून विज्ञान झाँकी व ओझोन थराच्या क्षरामुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम, उपाययोजना व फायदे, भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे वैज्ञानिक झाँकी, राणी दुर्गावती कन्या तथा कला कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वच्छतेवर आधारित पथनाट्य आदींसह विविध शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
































