
गडचिरोली : गोंदिया ते बल्लारशाह या रेल्वेमार्गाच्या विकासासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 240 कि.मी. लांबीच्या दुसऱ्या रेल्वेलाईनला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 4819 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निर्णय ऐतिहासिक असून यामुळे दळणवळण वाढेल आणि या मार्गावरील वडसा रेल्वे स्थानकासह प्रस्तावित गडचिरोली रेल्वे स्थानकाचेही महत्व वाढेल, असा विश्वास माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.
या निर्णयाचे मुख्य फायदे
दुहेरी मार्गामुळे गाड्यांची गती वाढेल आणि गाड्यांना विलंब होणार नाही. दुसरी लाईन आल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल. औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. विदर्भातील उद्योग व वाणिज्य केंद्रांना चालना मिळेल. सुधारित रेल्वे सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी वाढतील.
विदर्भातील नागरिकांसाठी दिलासा
हा प्रकल्प गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा फायदा होईल, असे मत माजी खासदार तथा भाजप अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केले. तसेच आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे त्यांनी आभार मानले.
मा.खा.नेते यांचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा
गोंदिया – बल्लारशाह रेल्वेमार्गाच्या विस्तारासाठी खासदार असताना डॉ.अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले. विदर्भात रेल्वेचे विस्तृत जाळे निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले असून, या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.