अहेरी : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातल्या चार खेळाडूंची हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय टी-10 टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
14 ते 17 सप्टेंबरदरम्यान 19 वर्षीय वयोगटातील राष्ट्रीय टी-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कुल्लू येथील दसरा मैदानात होणार आहे. त्या स्पर्धेसाठी राज्याच्या शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातील दुर्गम गावांमधील बंटी समय्या पेडाकुला, श्रीशांत श्रीनिवास गट्टू, कार्तिक रवी निम्माला आणि फिरोज शमशेर खान या चार युवकांची निवड झाली आहे. त्यांनी अहेरी येथील राजवाड्यात येऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक सतीश भोगे, रवी सुलतान आणि सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या खेळाडूंनी या अगोदर वरोरा येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागातील युवकांना पहिल्यांदाच टी-10 क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली असून ही समस्त जिल्हावासीयांसाठी गौरवाची बाब आहे.