गडचिरोली : केंद्र शासनाच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणामार्फत खेलो इंडिया योजनेअंतर्गत राज्यातील क्रीडापटूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथे खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या केंद्रात ॲथलेटिक्स, सायकलिंग आणि शूटिंग या क्रीडा प्रकारांसाठी निवासी प्रशिक्षण व क्रीडा विज्ञान केंद्र कार्यरत आहे. त्यातील शूटिंग (नेमबाजी) या क्रीडा प्रकारातील निपुण खेळाडूंसाठी 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, पुणे येथील शूटिंग रेंजवर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

पात्रता व अर्ज प्रक्रिया
या निवड चाचणीसाठी खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2005 नंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच, राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेले अथवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग / प्राविण्य प्राप्त खेळाडूच या चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. इच्छुक पात्र खेळाडूंनी परिशिष्ट अ (Annexure-A) नुसार पात्रता तपासून आज, दि.24 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत परिशिष्ट ब आणि क (Annexure-B, C) नुसार अर्ज ई-मेलद्वारे dsogad2@gmail.com या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
निवड चाचणीसाठी उपस्थित राहताना खेळाडूंनी पुढील कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात : राज्य/राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्म दाखला, शैक्षणिक कागदपत्रे.
अधिक माहितीसाठी व परिशिष्टाकरिता जिल्हा क्रीडा कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. तसेच 9595469847 या क्रमांकावरही आवश्यक मार्गदर्शन मिळू शकते. या निवड चाचणीद्वारे राज्यातील गुणवंत नेमबाज क्रीडापटूंना दर्जेदार प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश मिळविण्यासाठी होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
































