शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची हजेरी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातील जवान हे माओवाद्यांशी लढताना मोठे शौर्य आणि पराक्रमाचे प्रदर्शन करीत असतात. आपले कर्तव्य बजावत असताना गडचिरोली जिल्ह्यात विविध सुरक्षा दलांच्या एकूण 213 जवानांनी सर्वोच्च बलीदान दिले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिवाळी सणानिमित्त अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे व इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांकरीता दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात डॅा.छेरिंग दोरजे यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘गडचिरोली पोलीस दलातील सर्व जवान अतिशय शौर्याने माओवादाचा सामना करीत आहेत. या लढाईत शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानामुळेच गडचिरोली जिल्हा आज माओवादापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आला आहे. सर्व शहीद जवानांचे कुटुंबिय हे आमच्या कुटुंबाप्रमाणेच असून महाराष्ट्र पोलीस व गडचिरोली पोलीस दल नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ असे ते म्हणाले.

यानंतर डॉ.छेरिंग दोरजे, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबातील उपस्थित सर्व कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या हस्ते दिवाळी फराळ भेट दिला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी हेसुद्धा उपस्थित होते.