गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेल्या विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकांमधून भरावयाची आहेत. त्याअनुषंगाने 1 जानेवारी 2025 पर्यंत पुर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणांची तपासणी करुन गृहचौकशी अहवालाच्या अधिन राहून 224 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.
प्रतिक्षाधीन सुचीतील अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता, तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियेद्वारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला / भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
अनुकंपा पदभरती प्राधान्याने करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांपैकी किमान 20 टक्के पदे अनुकंपा यादीतील उमेदवारांमधून भरावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विभागप्रमुखांना दिली. अनुकंपा भरती प्रक्रियेस गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, ज्या शासकीय कार्यालयांकडे स्वतःची अनुकंपा प्रतीक्षा यादी उपलब्ध नाही, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामायिक प्रतीक्षा यादीतून उमेदवारांची मागणी करावी.
विशेष बाब म्हणून, नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेत सामावून घेण्याबाबत 6 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. सदर निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीत सध्या 98 उमेदवार नोंदले गेले असून, त्यांनाही अनुकंपा भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पार पाडण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.