अहेरी : धर्मरावबाबा आत्राम मित्र परिवार आणि नारायणन आय.ए.एस.अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने येथील वासवी सभागृहात ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात अभिनेत्री व सुप्रसिद्ध शाहीर सीमा पाटील यांनी शिवछत्रपती, फुले, शाहू, बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके अशा अनेक महापुरुषांच्या जीवनपटावर शाहीरी आणि नृत्यनाट्यातून प्रकाश टाकत अहेरीकरांना सांस्कृतिक मेजवाणी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रंगमंचावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम, बबलू हकीम, रवींद्र वासेकर, पुष्पा अलोणे, रियाज शेख, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सुरेंद्र अलोणे, सुनील दहेगावकर, डेव्हिड बोगी, नागेश मडावी, डॉ.अतुल परशुरामकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शाहीर सीमा पाटील आणि संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक जॉली मोरे यांनी सांस्कृतिक व कलात्मक प्रबोधनाच्या माध्यमातून महापुरुषांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. वेशभुषेतून प्रत्यक्षात ते महापुरुषच अवतरल्याचा भास होत होता. कार्यक्रमाच्या अखेरच्या क्षणी महापुरुषांच्या गीतांवर शाहीर सीमा पाटील यांनी सर्वांना रिझविले. कित्येक जण त्या गाण्यांच्या तालावर ठेका धरत थिरकले.
गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार!
भारतीय संविधानाची गौरवगाथा या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात नारायणन आय.ए.एस.अकॅडमीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महाशिबिर तथा स्पर्धा परीक्षा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर सायंकाळच्या सत्रात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच उपस्थित सर्वांना भारतीय संविधान या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.