गडचिरोली : अतिशय भक्तीमय वातावरणात रविवारी रामनवमी, अर्थात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी 12 वाजता ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये जन्मोत्सव, गोपाळकाला, दिवसभर महाप्रसाद आणि संध्याकाळी शोभायात्रा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन अनेक ठिकाणी केले होते.
गडचिरोली शहरात संध्याकाळी निघालेल्या वेगवेगळ्या शोभायात्रांमध्ये तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांवर मनसोक्त नाचत तरुण-तरुणी भक्तीसोबत या उत्सवाचा स्वानंद घेत होते. काही शोभायात्रांमध्ये विविध देखावे सादर करत नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. भगवान शंकराचे तांडव नृत्य आणि मस्तकावरील तिसऱ्या डोळ्यातून निघणारी आग हे विशेष आकर्षण ठरले.
इंदिरा गांधी चौकात बजरंग दलाच्या वतीने डिजीटल बोर्डवर प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारली होती. त्या ठिकाणी लोक नतमस्तक होत होते. रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या शोभायात्रा इंदिरा गांधी चौकात एकत्र आल्यानंतर चौकासह चारही मार्ग भाविकांच्या गर्दीने व्यापून गेले होते. यावेळी आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आयोजित भागवत सप्ताहाची श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याने सांगता झाली. काही ठिकाणी गीत रामायणाचाही कार्यक्रम आयोजित केला होता.