लॅायड्स मेटल्सच्या मदतीने सहा विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना

8.33 कोटींचा खर्च, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

गडचिरोली : जिल्ह्यात खाण उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)च्या वतीने सुरजागड ग्रामपंचायतीमधील 6 विद्यार्थ्यांना खाण तंत्रज्ञानाच्या उच्चशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात ला पाठविण्यात आले. शिकण्याची तयारी आणि इंग्रजी भाषेच्या सखोल प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांचा संपूर्ण खर्च, 8 कोटी 33 रुपये कंपनीकडून केला जाणार आहेत. मुंबईत या विद्यार्थ्यांना एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीत लॅायड्स मेटल्सने ही संधी उपलब्ध करून देत या भागातील सकारात्मक बदलांची एक झलक दाखविली आहे. लॅायड्स मेटल्सच्या टीमने सुरजागड ग्रामपंचायतीमधील दहावी, बारावी आणि पदवी पूर्ण केलेल्या आणि उच्च शिक्षणात रूची असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड केली होती. सुरूवातीला 14 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यातून सहा विद्यार्थ्यांनी अंतिम निवड करण्यात आली.

ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीत हे विद्यार्थी उच्चशिक्षण घेणार असून प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च दरमहा अंदाजे 2.9 लाख रुपये राहणार आहे. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती प्राप्त 6 विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला मुंबईत शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) आता ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील कर्टिन विद्यापीठात उच्चशिक्षणाला पाठविल्या जाणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या तयारीला लागले असून त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.