देशातील 10 केंद्रांमध्ये गडचिरोलीचा समावेश अभिमानास्पद- आदिती तटकरे

आरोग्य व पोषण क्षेत्रात दिशादर्शक ठरणार

गडचिरोली : केंद्र शासनामार्फत देशातील 10 जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात असून त्यात महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन रविवारी महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करून गडचिरोली जिल्हा गर्भवती व स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांच्या आरोग्य व पोषण क्षेत्रात महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणारी कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केला.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन गडचिरोलीतील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये करण्यात आले. ना.धर्मरावबाबा आत्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महिला व बालकांच्या आरोग्याच्या विकासाकरिता आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे तांत्रिक कौशल्ये आणि क्षमता वाढीसाठी हे कौशल्य विकास केंद्र महत्वपूर्ण ठरेल. गडचिरोलीसारख्या अवघड क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात हे केंद्र मुद्दाम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रातून राज्यातील जास्तीत जास्त पर्यवेक्षिकांना प्राधान्याने प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून त्या इतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनाही प्रशिक्षित करतील. कुठल्याही बालकाच्या जीवनामध्ये त्याच्या आईनंतर दुसरी महत्त्वपूर्ण स्त्री ही अंगणवाडी सेविका असते. राज्याचं सुदृढ भविष्य अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून निर्माण करायचे आहे. कुपोषण टाळण्यासाठी अंगणवाडी सेविकांना योग्य मार्गदर्शन व कौशल्य विकासाची गरज या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कौशल्य विकास केंद्र गडचिरोलीसारख्या जंगलव्याप्त, दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा अवघड जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले. येथील कुपोषणाची समस्या नियंत्रित करण्यासाठी हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरेल. अन्न हे औषधाप्रमाणे सेवन करावे, अन्यथा औषध अन्नाप्रमाणे घ्यावे लागेल, असे सांगून त्यांनी योग्य पोषण आहाराचे महत्व सांगितले.

आयुक्त कैलास पगारे यांनी प्रास्ताविक केले. हे कौशल्य विकास केंद्र अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून त्यात प्रात्यक्षिकांसाठी थ्रीडी मॉडेल्स, विकासवाढ निरीक्षण, आरोग्य तपासणी, पोषण मूल्यमापन साधने, अन्न पदार्थ तयार करण्याच्या प्रात्याक्षिकासाठी स्वयंपाकघर आणि डिजिटल तांत्रिक साहित्याचा समावेश आहे. या प्रकल्पात सहकार्य करणारे गीज कंपनीचे वरिष्ठ सल्लागार डॉ.तपन गोपे, जेपिंगो कंपनीचे सुरनजीत प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.