गडचिरोली : व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता आभासी पद्धतीने वर्धा येथून या केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या 13 महाविद्यालयांमध्ये उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी इंटरनेट व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आढावा बैठकीत दिले. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले.
कौशल्य विकास केंद्र देण्यात आलेल्या 13 महाविद्यालयांमध्ये केवळरामजी हरडे कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर चामोर्शी, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, अॅड.एन.एस. गंगुवार कॉलेज ऑफ एज्युकेशन गडचिरोली, एम.एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली, गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज गडचिरोली, महात्मा गांधी आर्ट्स-सायन्स अँड एन.पी.कॉमर्स कॉलेज, राजे धर्मराव आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आल्लापल्ली, किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड, सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, महिला महाविद्यालय गडचिरोली, जे.एस.पी.एम. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा अशा 13 महाविद्यालयांचा यात समावेश असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी सांगितले.