आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आज सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा

मूळ अवशेष पाहण्याची संधी

गडचिरोली : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनतर्फे आज दि. 1 जुलै रोजी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा यात्रा गडचिरोलीत दाखल होत आहे. येथील सुमानंद सभागृहात (आरमोरी रोड) आयोजित या यात्रेद्वारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष भाविकांसमोर आणले जातील. हे अवशेष म्हणजे भारताच्या संस्कृतीचा आणि अध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

हे अवशेष त्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाची आहेत, जी 1026 ई.स.मध्ये मोहम्मद गजनीने नष्ट केली होती. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये पहिले असलेले सोमनाथ मंदिर आजही श्रद्धेचे प्रतीक म्हणून उभे आहे. 1026 मध्ये घडलेला विध्वंस सर्वात भयंकर होता. लाखो भक्तांनी पूजलेले ज्योतिर्लिंग त्याने उद्ध्वस्त केले, मात्र त्याचे काही अवशेष अग्निहोत्री ब्राह्मण कुळाने दक्षिण भारतात सुरक्षित ठेवले. त्यानंतर हे अवशेष कांची येथील शंकराचार्यांकडे नेले आणि जनतेसमोर आणण्याची परवानगी मागितली. शंकराचार्यांनी आशीर्वाद देत, 100 वर्षे याला गुप्त ठेवा, त्यानंतर हे अवशेष कर्नाटक येथे एक शंकर नावाचे संत होतील त्यांच्याकडे घेऊन जा. ते याला योग्य प्रकारे पुढे नेतील, असा सल्ला दिला. आज तेच पवित्र अवशेष सर्वांसाठी उपलब्ध होत आहेत.

ही ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून जाणार असून, लाखो भक्तांना त्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. पूजा, सत्संग, ध्यान आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक कार्यक्रमही यामध्ये असतील . ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जागराचा भाग आहे.

यात्रेची वैशिष्ट्ये :

या कार्यक्रमात सोमनाथ ज्योतिर्लिंग अवशेषांचे दर्शन सोहळा आणि ⁠सत्संग, भजन, मार्गदर्शित ध्यान, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षकांद्वारे घेतले जाणार आहे. यात सकाळी 9 ते 11 रुद्र पूजा आणि 11 ते 5 दरम्यान सुमानंद सभागृहात दर्शन सोहळा राहणार आहे.

जिल्ह्यातील व शहरातील बहुसंख्य नागरिकांनी या अद्वितीय अध्यात्मिक अनुभवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.