गडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र आज महाशिवरात्री उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त सर्व प्रमुख शिवमंदिरांच्या परिसरात जत्रा भरल्या आहेत. पौराणिक महत्व असलेल्या मार्कंडादेव येथे पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे एसटी महामंडळाने मार्कंडासह काही प्रमुख शिवमंदिरांच्या ठिकाणी जाण्यासाठी विशेष बसफेऱ्यांचेही नियोजन केले आहे.
मार्कंडा येथे उत्तरवाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावरील मार्कंडेश्वर मंदिराला विशेष धार्मिक महत्व आहे. त्यामुळे या हेमाडपंथी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तीभावे पुजा-अर्चा करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळते. गडचिरोली आणि चंद्रपूरच नाही तर राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा असलेल्या मार्कंडात गेल्या चार दिवसांपासून विविध दुकाने सजली आहेत. महाशिवरात्रीनंतरही 4 ते 5 दिवस ही जत्रा कायम असते.
एसटी महामंडळाकडून विशेष बसफेऱ्या
एसटी महामंडळाच्या गडचिरोली विभागाने मार्कंडादेव, चपराळा, कालेश्वरम (तेलंगणा), अरततोंडी, व्यंकटापूर, भंडारेश्वर अशा काही प्रमुख ठिकाणांसाठी विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यात सर्वाधिक 70 बसगाड्या मार्कंडासाठी राहणार आहेत. यात्रेदरम्यान त्यांच्या 1500 फेऱ्या होतील.
विशेष म्हणजे यावर्षी महाशिवरात्री रविवारी असल्यामुळे शाळांना सुटी आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस म्हणून चालणाऱ्या मानव विकास मिशनच्या 105 बसगाड्या यात्रेसाठी वापरल्या जातील. त्यामुळे नियमित मार्गांवरच्या बसफेऱ्या रद्द करण्याची गरज पडली नसल्याचे विभाग नियंत्रक अशोक भाडीभस्मे यांनी सांगितले. गेल्यावर्षी महाशिवरात्रीसाठी सोडलेल्या विशेष बसफेऱ्यांमधून गडचिरोली विभागाला 30 लाखांचे उत्पन्न झाले होते. यावर्षी 37 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.
































