उत्साह, ऊर्जा आणि एकतेचा उत्सव ठरला ‘अमृत’ महोत्सव

450 अधिकारी-कर्मचारी सहभागी

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या तीन दिवसीय ‘अमृत क्रीडा व कला महोत्सवा’ची जल्लोषात सांगता झाली. या महोत्सवाने विद्यापीठ परिसर अक्षरशः उत्साह, ऊर्जा, ताल आणि जल्लोषाने न्हाऊन निघाला होता. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी, तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयांतील सुमारे 450 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव केवळ स्पर्धांचा कार्यक्रम न राहता, एकात्मता आणि सृजनशीलतेचा उत्सव ठरला.

उद्घाटनानंतर दिवसभर क्रीडांगणावर स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळाला. मैदानावर प्रत्येक खेळाडूने जिद्द, चिकाटी आणि संघभावनेचे अप्रतिम दर्शन घडविले. विजयाच्या ध्येयाने धावणारी पावले आणि सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे उत्साहावर्धक सहकारी यामुळे संपूर्ण परिसर स्पर्धात्मक उत्साहाने दुमदुमला.

संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिकच रंगतदार केले. समूह व एकल गीत गायनातून सुरेल स्वरांनी रसिकांची मने जिंकली. लघुनाटिका आणि एकपात्री नाटिकांमधून सामाजिक आशय, विनोद आणि भावस्पर्शी अभिनयाचा संगम साकारला गेला. प्रत्येक सादरीकरण जणू कर्मचाऱ्यांच्या मनातील सुप्त प्रतिभेचा झरा उलगडणारे ठरले.

कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, क्रीडाभावना वृद्धिंगत व्हावी आणि परस्परांतील संवाद व ऐक्य अधिक दृढ व्हावे, या हेतूने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले होते. यंदा महोत्सवाचे पाचवे वर्ष असून प्रत्येक वर्षी वाढत जाणारा सहभाग आणि ओसंडून वाहणारा उत्साह या पर्वाला अधिक समृद्ध बनवत आहे. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी हा आठवणीत राहणारा सांस्कृतिक सोहळा ठरला आहे.

समारोप व बक्षीस वितरण

अमृत क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रमा विद्यापीठाचे कुलसचिव डॅा.अनिल हिरेखन यांच्या अध्यक्षस्थातेखाली झाले. याप्रसंगी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक (प्र.) डॉ.अनिता लोखंडे, गोंडवाना विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सतीश पडोळे, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संदेश सोनुले, उपाध्यक्ष विजयालक्ष्मी परचाके, महाविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खोके, महासचिव अरुण जुनघरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती .

व्हॉलीबॉल आणि रस्साखेच स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, दौड, रस्सीखेच, बॅडमिंटन, संगीत खुर्ची तसेच एकल व समुह गीत गायन, एकल व समुह नृत्य, एकपात्री व लघु नाटिका आदी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.