पाच बिटमधील आश्रमशाळांचे अडीच हजारावर खेळाडू दखविणार क्रीडा कौशल्य

आजपासून बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा व कोरची या पाच बिटमधील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांना बुधवार, दि.18 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या क्रीडा संमेलनात गडचिरोली प्रकल्पातील 24 शासकीय तथा 17 अनुदानित अशा एकूण 41 आश्रमशाळांमधील जवळपास 2 हजार 500 आदिवासी खेळाडू सहभागी होणार आहेत.

कारवाफा बिटमधील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर सकाळी 9 वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पोटेगावच्या सरपंच अर्चना सुरपाम राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बी.एस.कांबळे, तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनराज डबले, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शारदा कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडू पोटावी, गव्हाळहेटीच्या सरपंच कांता हलामी, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

14, 17 व 19 वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळांसह लांब उडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहेत, असे प्रसिद्ध प्रमुख सुधीर शेंडे यांनी कळविले.