आलापल्ली : अहेरीवरून प्रवासी घेऊन अमरावतीकरिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराची बस समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना रस्त्याच्या खाली उतरून उलटली. लगामजवळ झालेल्या या अपघातात कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी वाहनाकसह चार प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारच्या सकाळी लगाम ते आष्टी रस्त्यावरील वन विभागाच्या नाक्याजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी आगाराची एमएच-07, सी-9463 ही बस प्रवाशांना घेऊन सकाळी 9 वाजताच्या सुमारास अमरावतीकरीता निघाली. अहेरीवरून वर्धामार्गे ही बस अमरावतीला जाणार होती. मात्र अहेरीवरून निघालेली ही बस आलापल्ली बस स्थानकावरून निघाली असताना राष्ट्रीय महामार्गावर लगामच्या पुढे वनविभागाचा नाका ओलांडल्यावर समोरून एक ट्रक (एमएच 34, बीझेड-4520) अचानक एसटी बससमोर आला. त्यामुळे बसचालक प्रदीप मेश्राम यांनी आपली बस डाव्या बाजूला घेतली. मात्र डाव्या बाजूला उतार असल्याने बस रस्त्याखाली उतरून उलटली.
या बसमध्ये चालक पी.आर. मेश्राम आणि वाहक डी.एस. मेश्राम यांच्यासह जवळपास 24 प्रवासी होते. त्यातील वाहक डी.एस. मेश्राम आणि इतर चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यात पायल गुलाब झुरे (20 वर्ष) रा.अहेरी, तबसुम अमजदखान पठाण (23 वर्ष) रा.नागेपल्ली, रियाज अमजदखान पठाण (19 वर्ष) रा.नागेपल्ली, नीमाई सन्यासी सरकार (34 वर्ष) रा.गिताली ता.मुलचेरा आणि वाहक दीपक शंकर मेश्राम यांचा समावेश आहे.
बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. अहेरी आगार व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व उर्वरित प्रवाश्यांची विचारपूस करत दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढे पाठविले. काही प्रवासी भयभीत झाल्याने माघारी परतले.