राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा आज दुपारी निकाल

कोणत्या वेबसाईटवर पाहता येईल, वाचा

गडचिरोली : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील 12 वी परीक्षेचा निकाल महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.

निकाल दिसणारी संकेतस्थळे (वेबसाईट) खालीलप्रमाणे आहेत.

1) mahresult.nic.in 2) http://hscresult.mkcl.org 3) www.mahahsscboard.in 4) https: //results.digilocker.gov.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण सदर संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट आऊट) सुद्धा घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.

यासोबतच mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी दि.22 मे 2024 ते 5 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.