गडचिरोलीत किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची राज्य बैठक

हिवताप मुक्ती अभियानाचा आढावा

गडचिरोली : राज्यातील किटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून सर्च फाउंडेशन येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आणि आढावा बैठक झाली. सहसंचालक (आरोग्य सेवा) पुणे यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन केले होते.

सर्चचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी उपस्थितांना किटकजन्य आजार नियंत्रणाच्या सामुदायिक मॉडेलवर आधारित मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, सहायक संचालक (हिवताप) नैना धुपारे, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे आदी उपस्थित होते.

बैठकीचे स्वरूप आणि प्रमुख चर्चा

दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम केले तर हिवताप दुरीकरण नक्कीच होऊ शकते असे सांगितले. या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप नियंत्रणाचा कार्यक्रम होता. डॉ.प्रताप शिंदे यांनी ‘गडचिरोली हिवतापमुक्त अभियान योजने’वर सविस्तर सादरीकरण केले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुजिता वाडीवे यांनी अंमलबजावणीतील कार्यक्रम आणि अद्ययावत माहिती सादर केली.

अध्यक्ष डॉ.अभय बंग यांनी ‘हिवताप नियंत्रण उपाय’ यावर उपस्थितांशी विस्तृत संवाद साधला. तसेच वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी डॉ.अचिंत्य श्रीवास्तव, पाथचे राज्य समन्वयक डॉ.अमित गंभीर यांनीही तांत्रिक सादरीकरण केले. दिवसभर सखोल चर्चा झाल्यानंतर डॉ.संदीप सांगळे यांनी राज्याच्या किटकजन्य आजार नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे अधिकारी, तज्ज्ञ आणि जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते. आरोग्य सेवा तथा एनएचएमच्या अभियानाच्या संचालक डॉ.कादंबरी बलकवडे (भा.प्र.से.) दूरदुष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

क्षेत्र भेटीद्वारे कामाची माहिती

या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी 30 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी आणि ग्रामस्तरावरच्या कामाची माहिती घेण्यासाठी विस्तृत क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्यात आरोग्य पथकांनी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र गोडलवाही आणि उपकेंद्र कोंदावाही या ठिकाणी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या हिवतापविषयक कामकाज आणि इतर सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी नेमकी कशी चालते हे जाणून घेतले.