मेंढा-लेखाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेलवर राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर

प्र-कुलगुरु डॉ.कावळे यांनी केले उद्घाटन

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकॅडमी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंढा-लेखा : लोकशाही व स्वशासन मॉडेल’ या विषयावर मेंढा-लेखा येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय तीन दिवसीय (FDP) प्रशिक्षणाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मेंढा-लेखा गावाच्या लोकशाही व स्वशासन मॉडेल या विषयावरील अभ्यास प्रशिक्षणामधून सहभागी प्राध्यापकांना निश्चितच नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन यावेळी बोलताना प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांनी केले. मेंढा-लेखा गावचे लोकशाही व स्वशासन मॉडेल अनुभववादी असून याचा गांभीर्यपूर्वक अभ्यास व संशोधन करणे महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणामुळे प्राध्यापकांना नवा विचार व एक सामजिक दृष्टी मिळेल, असेही ते म्हणाले.

यावेळी मेंढा-लेखा गावच्या सरपंच नंदा दुग्गा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकॅडमीच्या संचालक डॉ.कल्याणी गोखले, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ.प्रिया गेडाम, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ.हेमराज निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हे प्रशिक्षण 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, परभणी, अमरावती, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमधून प्राध्यापक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमासाठी कुलगुरु डॉ.प्रशान्त बोकारे यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे डॉ.प्रिया गेडाम यांनी प्रास्ताविकात सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.नरेश मडावी, फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ.रुपेंद्रकुमार गौर, महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.कुंदन दुपारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आभार डॉ.हेमराज निखाडे यांनी मानले.