
देसाईगंज : ढिवर भोई समाज संघटना तुळशीच्या सौजन्याने उदय मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था तुळशीच्या पटांगणावर 19 मार्च रोजी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठा, लोकार्पण व समाज प्रबोधन कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. (अधिक बातमी खाली वाचा)

याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पुतळ्याची विधीवत पूजा-अर्चना केली. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पारधी, सरपंच चक्रधर नाकाडे, उपसरपंच सुरज तोंडफोडे, परसराम टिकले, नितीन राऊत, दादाजी भर्रे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला व युवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी बोलताना कृष्णा गजबे म्हणाले, महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे महान रचयिता व आदर्श समाज सुधारक आहेत. त्यांच्या शिकवणींमध्ये प्रेम, करुणा, सत्य व धर्म यांचा संगम समावेश आहे. ढिवर भोई समाजाने त्यांच्या आदर्शांचे काटेकोरपणे पालन करून सामाजिक एकता, शिक्षण व प्रगती साधावी. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाल्मिकी ऋषींच्या शिकवणी आपल्याला योग्य दिशा देतील, असे गजबे म्हणाले. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात असे धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम वाढवावेत, जेणेकरून आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल. शिक्षण, आरोग्य, शेती व उद्योग क्षेत्रात प्रगतीसाठी सर्व जाती-जमाती एकत्र याव्यात. वाल्मिकी ऋषींच्या आशीर्वादाने तुळशी गाव ओळखले जाईल व समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी मा.आ.गजबे यांनी व्यक्त केला.




































